चिखली (हॅलो बुलढाणा) चिखली तालुक्यातील केळवदजवळ भरदिवसा झालेल्या थरारक मारहाणीने परिसर हादरला आहे. नांदेड जिल्ह्यातील उचेगाव येथील अनिल शिंदे (वय 30) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे सहकारी गणेश भागवत गुडडा यांच्यावर स्विफ्ट डिझायर (MH 01 CJ 5716) मधून आलेल्या 2-3 जणांनी अचानक हल्ला चढवला.
घटनेनुसार, संभाजीनगरवरून चिखलीकडे येत असताना केळवदजवळील हॉटेल गुलमोहर परिसरात दोन्ही गाड्या थांबल्या. यावेळी काही बोलाचालीदरम्यान आरोपींनी गणेश गुडडा यांना बेदम मारहाण करत काठीने डोक्यावर प्रहार केला. गंभीर जखमी अवस्थेत ते रस्त्याच्या कडेला कोसळले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून चिखलीच्या दिशेने पसार झाले.
जखमीला तातडीने बुलढाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे चिखली परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, हल्लेखोरांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.










