बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवडा होणार असल्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये एकच खळबळ उडवली असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करत कडक आदेश जारी केले आहेत.
जिल्हा पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, सोशल मीडियावर पसरलेल्या खोट्या बातम्यांमुळे नागरिक अनावश्यकपणे इंधन साठवण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
नवीन आदेशानुसार, कोणत्याही पेट्रोल पंपावरून पेट्रोल किंवा डिझेल प्लास्टिक बाटली, कॅन किंवा इतर अनधिकृत भांड्यात देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरणे बंधनकारक करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच, सर्व पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा सुरू ठेवणे, रोजच्या साठ्याची माहिती फलकावर प्रदर्शित करणे आणि रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने इंधन पुरवठा करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांनाही स्पष्ट संदेश दिला आहे की, “कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि गरजेपेक्षा जास्त इंधन साठवू नका.” अफवा पसरवणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या आदेशामुळे इंधन साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रशासन आता पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.










