बुलढाणा (हॅलो बुलडाणा) चिखली मतदारसंघातील झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर संजय गायकवाड यांच्या एका वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे.“कार्यकर्त्यांसाठी ३५ कोटी रुपयांचे कमिशन सोडले,” असा दावा करत त्यांनी स्वतःच्या त्यागाची भूमिका मांडली; मात्र ‘कमिशन’ या शब्दामुळे विरोधकांनी मुद्दा उचलत प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आहे.
रविवारी बुलढाण्यातील मातोश्री जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात चिखली मतदारसंघातील १८ गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना आ.गायकवाड यांनी कार्यकर्त्यांच्या बळावरच आपली ताकद असल्याचे सांगत, “पूर्वी सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात,” असे उदाहरण दिले.मात्र ३५ कोटींच्या उल्लेखानंतर वातावरण तापले.
वाद वाढताच गायकवाड यांनी स्पष्टीकरण देत “कमिशन नव्हे, कार्यकर्त्यांना ३५ कोटी रुपयांची कामे दिली,” असे सांगितले. तरीही या शब्दप्रयोगामुळे राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण कायम आहे.
दरम्यान, भाषणात त्यांनी मित्रपक्ष भाजपवर थेट हल्ला चढवत कार्यकर्त्यांवर अन्याय केला तर गाठ माझ्याशी आहे,असा इशारा दिला.त्यांच्या आक्रमक शैलीमुळे महायुतीत तणाव उफाळल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीवरही अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा रंगली आहे.
याचबरोबर चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनाही अप्रत्यक्ष आव्हान दिल्याचे मानले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये महाले यांच्या पीए सुरेश इंगळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नाव न घेता गायकवाडांवर निशाणा साधला. “वाचाळ लोक स्वतःच अडचणीत येतात… ३५ कोटींचे कमिशन,” आणि “शाळा शिकणे किती महत्त्वाचे आहे” असा टोला त्यांनी लगावला.
एकीकडे गायकवाडांचा आक्रमक पवित्रा, दुसरीकडे भाजप-शिवसेना युतीतील अंतर्गत नाराजी आणि त्यातच स्थानिक नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप यामुळे बुलढाण्यातील राजकारण तापले आहे.‘कमिशन’ या एका शब्दाने पेटलेला हा वाद आता केवळ स्पष्टीकरणाने शांत होईल का, की याचे मोठे राजकीय परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदारांना काय बोलले?
आमदार संजय गायकवाड यांनी भाषणात पुढील लोकसभा निवडणुकीचा मुद्दा उपस्थित करत, “पुढची लोकसभा कोण लढणार, हे सगळ्यांना माहिती आहे,” असे सूचक वक्तव्य केले. यामुळे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
“कुणाची माय… मी बघतो!”
कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्यांना थेट इशारा देताना “कुणाची माय… मी बघतो!” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.










