spot_img
spot_img

बुलडाण्यात घरगुती गॅस सिलिंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर; तहसीलदार विठ्ठल कुमरे यांची धडक कारवाई!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारींना गांभीर्याने घेत जिल्हा प्रशासनाने मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. बुलडाण्याचे तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी आज शहरातील विविध हॉटेल्स व खाद्यव्यवसायिकांवर अचानक छापे टाकत अवैध वापरावर जोरदार कारवाई केली.

जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कुमरे यांच्या पथकाने शहरातील अनेक भागांत तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर थांबवणे आणि कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर लगाम घालणे हा होता.

या कारवाईदरम्यान पथकाने जवळपास ४० हॉटेल्स व प्रतिष्ठानांची तपासणी केली. तपासणीमध्ये धक्कादायक बाब समोर आली असून, अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रासपणे व्यावसायिक वापर केला जात असल्याचे आढळून आले.

प्रशासनाने ११ ठिकाणी छापे टाकून एकूण १४ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. काही हॉटेल मालकांनी कारवाईची माहिती मिळताच सिलिंडर लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले. मात्र प्रशासनाच्या पथकाने सतर्कतेने कारवाई करत हे प्रकार उघडकीस आणले.

या प्रकरणी संबंधित हॉटेल मालकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर हा नियमबाह्य असून यामुळे सामान्य नागरिकांना गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी निर्माण होतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील हॉटेल चालकांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पुढील काळातही अशीच तपासणी मोहीम सुरू ठेवली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!