spot_img
spot_img

💥💥Breaking! चिखलीच्या जयस्तंभ चौकात भीषण आग; 5-6 दुकाने जळून खाक!

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शहरातील मध्यवर्ती जयस्तंभ चौक परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या आगीत तब्बल पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयस्तंभ चौकातील भेळ सेंटर बागवानांच्या फळांच्या दुकानांसह एक घड्याळाचे दुकान आणि इतर काही लहान व्यावसायिकांची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते गोपाल देव्हडे यांनी स्वतः अग्निशमन दलाची वॉटर गन हातात घेत आग विझवण्यासाठी धाडसी मदत केली. त्यांच्या या कृतीचे उपस्थित नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान, या भीषण आगीचे गांभीर्य लक्षात घेता परिसरातील दुकानदार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही; मात्र अनेक दुकाने जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी कुणाल बोन्द्रे, काशिनाथ बोन्द्रे, सुरेंद्र ठाकूर, सुहास शेटे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणीही स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे घटनास्थळापासून अवघ्या सुमारे 200 मीटर अंतरावर बोंद्रे पेट्रोल पंप असल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नसून प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!