बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील महिलांच्या कौशल्याला आणि उद्योजकतेला नवा मंच देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विमेन्स फेस्ट २०२६’ ला आज उत्साहात सुरुवात झाली असून बुलढाण्यात महिलाशक्तीचा अक्षरशः जल्लोष पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन, बुलढाणा यांच्या पुढाकारातून आयोजित या भव्य प्रदर्शनाने शहरात वेगळेच वातावरण निर्माण केले आहे.
शहरातील रेणुका मंगल कार्यालय, मेन रोड येथे भरवण्यात आलेल्या या फेस्टचे उद्घाटन बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा मा. सौ. कोमलताई सुकेशजी झंवर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सौ. स्वातीताई कन्हेर, डॉ. सुनीताजी बोथरा, सौ. अनुजाताई सावळे, सौ. अंजलीताई परांजपे, डॉ. वैशालीजी पडघान, सौ. दीपाजी अग्रवाल आणि डॉ. गायत्री साबळे यांची विशेष उपस्थिती लाभली.
महिलांच्या कर्तृत्वाचा आणि आत्मनिर्भरतेचा उत्सव ठरलेल्या या फेस्टमध्ये विविध आकर्षक स्टॉल्सची रेलचेल पाहायला मिळत आहे. कपडे, दागिने, हस्तकला, गृहउद्योग उत्पादने, सजावटीच्या वस्तूंसह महिलांनी तयार केलेल्या अनेक उपयुक्त वस्तूंनी प्रदर्शन गजबजले आहे. केवळ खरेदीच नव्हे, तर स्वादिष्ट आणि चटकदार खाद्यपदार्थांची मेजवानीही येथे नागरिकांना आकर्षित करत आहे.
२८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवस चालणाऱ्या या फेस्टमुळे बुलढाण्यातील महिला उद्योजिकांना आपली कला आणि व्यवसाय सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. ‘स्थानिक महिलांना प्रोत्साहन देत स्वावलंबनाचा मार्ग खुला करणे’ हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
संमेलनाच्या अध्यक्षा सौ. सपना अग्रवाल आणि सचिव सौ. वर्षा जैन यांनी बुलढाणेकर नागरिकांनी, विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.












