चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा स्थापनेदरम्यान झालेल्या वादातून संजीवनी वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज दि. 23 फेब्रुवारी रोजी चिखली बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी आस्थापने, किरकोळ दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली.
सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. प्रमुख चौकात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. “आरोपींना तात्काळ अटक करा”, “निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे” अशा जोरदार मागण्यांनी शहर दणाणून गेले. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.
दरम्यान, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंद पूर्णपणे शांततेत पार पडला असला तरी नागरिकांमध्ये संतापाची लाट स्पष्टपणे जाणवत होती.











