बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नाशिक जिल्ह्यातील सारूळच्या भयानक जंगलात सापडलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची ओळख पटताच संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. ही मुलगी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील अवघ्या १६ वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले असून तिच्या हत्येमागील धक्कादायक सत्य पोलिस तपासात समोर आले आहे.
ही घटना केवळ नाशिकची नाही, तर बुलढाणा जिल्ह्याच्या हृदयाला चिरणारी आहे. कारण जी मुलगी शिक्षणासाठी घराबाहेर पडली, तिचाच जीव तिच्या तथाकथित प्रियकराने घेतल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अथर्व देशमुख आणि त्याचा साथीदार सुमित सानप यांना अटक करण्यात आली असून आणखी एक संशयित फरार आहे.
घटनास्थळ नाशिक ग्रामीणमधील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. जंगलात सापडलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होता आणि मुलीच्या गळ्यात चाकू अडकलेला होता. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तिच्या मृतदेहाशेजारी पिझ्झा ठेवलेला आढळला. “पिझ्झा पार्टी”च्या बहाण्याने बोलावून क्रूर कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि आरोपी दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपी नाशिकमधील संदीप फाऊंडेशन येथे शिक्षण घेत होता, तर मुलगी अकोले येथे अकरावीत शिकत होती. मुलगी दुसऱ्या एका मुलाशी बोलत असल्याचा संशय आरोपीच्या मनात निर्माण झाला. “ती मला इग्नोर करतेय” या रागातून त्याने संतापाचा स्फोट केला आणि थेट तिचा जीव घेतला.
बुलढाण्यातून नाशिककडे येतानाच तिची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर मृतदेह जंगलात फेकून पुरावे लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कसून तपासामुळे हे गूढ उकलले.
या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. एका निरागस अल्पवयीन मुलीचा प्रेमाच्या नावाखाली बळी गेला. “इग्नोर” केल्याचा राग इतका टोकाला जाऊ शकतो का? हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात घोंघावत आहे.
हॅलो बुलढाणा या घटनेचा पाठपुरावा करत असून या प्रकरणातील प्रत्येक अपडेट वाचकांपर्यंत पोहोचवणार आहे. बुलढाण्याच्या लेकीस न्याय मिळालाच पाहिजे, हीच जिल्ह्याची एकमुखी मागणी आहे.











