spot_img
spot_img

💥BREAKING चिखला येथे संतापजनक प्रकार! महिला लोकप्रतिनिधीला मारहाण; आमदार सिद्धार्थ खरात आक्रमक

लोणार (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. पुतळा हटवण्याच्या हालचालींना विरोध करण्यासाठी गेलेल्या शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांच्यावर सरपंच व त्यांच्या समर्थकांकडून पोलिसांसमोरच मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. झटापटीदरम्यान त्यांचे कपडे फाडल्याचा आरोप करण्यात आल्याने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे.

काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी गावात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. तो हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळताच संजीवनी वाघ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर वातावरण तापले. त्यानंतर जमावाने त्यांना घेरून मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांच्या उपस्थितीतच प्रकार घडल्याचा आरोप अधिक गंभीर मानला जात आहे.

या घटनेनंतर संजीवनी वाघ यांनी सोशल मीडियावर आत्महत्येचा इशारा देणारे स्टेटस ठेवल्याने खळबळ उडाली. प्रशासनाने तात्काळ दखल घेत पोलिस बंदोबस्त वाढवला असून गावात तणाव कायम आहे.

दरम्यान, मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पोलिस प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिले. “दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक झालीच पाहिजे; कारवाईशिवाय मी येथून हलणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

या घटनेची दखल मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याची माहिती असून, ते लवकरच भेट देणार असल्याची चर्चा आहे. चिखला येथील प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप उसळला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!