चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) काल संध्याकाळपासून बेपत्ता असलेले ईसोली (ता. चिखली) येथील रामकिसन ज्ञानबा गवळी (वय ७०) यांचा मृतदेह आज दुपारी विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुंगे शिवारातील विठ्ठल येवले यांच्या शेतातील विहिरीत स्थानिकांना आज दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रामकिसन गवळी हे काल संध्याकाळी घरातून बाहेर पडले होते. मात्र रात्रभर ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी चिंतेतून शोधाशोध सुरू केली होती. अखेर आज दुपारी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
या प्रकरणी अमडापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू क्र. ८/२६ दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पुढील तपासणी व शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पाठविण्यात आला. ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय दिलीप तोंडे पुढील तपास करीत आहेत.











