जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील आसलगाव येथील शेठ तुळशीराम ढोकणे विद्यालय येथे घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला असून, शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव अक्षरशः धोक्यात घालण्यात आल्याचा संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये मालवाहक गाडीत डेक्स बेंच भरलेले दिसत असून, त्या बेंचला धरून काही विद्यार्थी उभे राहून प्रवास करत असल्याचे स्पष्टपणे दिसते. हा प्रकार अत्यंत जीवघेणा असून, थोडीशी चूक झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित विद्यार्थी डेक्स बेंच गावातील जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव येथे घेऊन जात होते, अशी माहिती समोर येत आहे.
शाळेच्या प्रशासनाने मालवाहू वाहनातून साहित्य नेण्यासाठी शिपाई किंवा मजुरांची मदत घेणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांकडूनच हे काम करून घेतल्याचा आरोप होत आहे. शिक्षण मंदिरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असणे गरजेचे असताना अशी बेफिकिरी का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
हा प्रकार केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असल्याची टीका होत आहे. संबंधित जबाबदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शिक्षण विभागाने कडक निर्देश द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.दरम्यान, प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का? की व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही कारवाईचा फक्त दिखावा होणार? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.











