बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पडताळणी प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस येण्याची चिन्हे दिसत असून, पहिल्याच कॅम्पमध्ये 200 पैकी केवळ 60 कर्मचारी उपस्थित राहिल्याने संशयाची सुई अधिकच तीव्र झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही अनेकांनी तपासणीकडे पाठ फिरवल्याने काय दडले आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांग म्हणून नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांची युडीआयडी व वैद्यकीय पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आयोजित कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरहजेरी राहिल्याने प्रशासनालाच धक्का बसला. काही कर्मचारी जाणीवपूर्वक तपासणी टाळत आहेत का, तसेच बोगस प्रमाणपत्रांचा खेळ तर सुरू नाही ना, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यभर पडताळणीचे आदेश दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा शल्य चिकित्सकांनी पुढील सोमवारी विशेष कॅम्प आयोजित करत कठोर इशारा दिला असून, संशयास्पद प्रकरणे वैद्यकीय बोर्डाकडे पाठवून अकोला येथे पुढील तपासणी केली जाणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत ‘हॅलो बुलडाणा’ने सुरुवातीपासूनच बोगस दिव्यांग धारकांचा मुद्दा उचलून धरला. प्रशासनाने केवळ औपचारिकता न करता पारदर्शक कारवाई करावी, अशी मागणी खऱ्या दिव्यांगांकडून होत आहे. आता सोमवारी होणाऱ्या कॅम्पमध्ये किती कर्मचारी हजर राहतात आणि गैरप्रकारांवर कितपत कठोर कारवाई होते, याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ‘कानून के हाथ बहुत लंबे है’ हे विसरून चालणार नाही, असा इशाराही चर्चेतून दिला जात आहे.










