चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) खामगाव-जालना महामार्गावर मीरा हॉटेलसमोर आज रात्री साडेसातच्या सुमारास दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात गोपाल सोळंकी (वय 14), साहेबराव सोळंकी (वय 70), सखाराम सोळंकी (वय 70, सर्व रा. कोलारा ता. चिखली) तसेच विकास भानुदास मोरे (वय 25, रा. अंत्री खेडेकर ता. चिखली) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमींना जवंजाळ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, खामगाव-जालना महामार्ग चिखली शहरातून जात असतानाही मेहकर फाटा ते चिखली दरम्यान एकही गतीरोधक नसल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढतो आणि वारंवार अपघात घडत आहेत. नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने गतीरोधक व सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासन जागे होणार की आणखी बळी जाणार, असा संतप्त सवालही स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.










