बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सासुरवाडीला भेट देऊन आनंदात घरी परतणाऱ्या तरुणाचा भरधाव ट्रकने कारला दिलेल्या जबर धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येळगाव ते साखळी दरम्यान पैनगंगा नदीच्या पुलाजवळ ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री हा भीषण अपघात घडला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महेश कडूबा लोढे (वय ३०, रा. मोहदरी, ता. मेहकर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश लोढे यांनी बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे सासुरवाडीला भेट दिल्यानंतर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास स्विफ्ट डिझायर (एमएच-२८-बीक्यू-२४१८) कारने आपल्या गावी परतीचा प्रवास सुरू केला होता. मात्र बुलढाणा–चिखली मार्गावरील साखळी फाट्याच्या अलीकडे पैनगंगा नदीच्या पुलाजवळ भरधाव वेगातील ट्रक (बीआर-०६-८४१२) अचानक समोर येत कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाला आणि महेश लोढे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून भरधाव ट्रकचालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मृत महेशचे काका केशव माधवराव लोढे यांच्या फिर्यादीवरून पोहेकॉ सुनीता खंडारे यांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ विकास सोनुने करीत आहेत. दरम्यान, या अपघातामुळे लोढे कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.










