spot_img
spot_img

💥BREAKING : ‘जिमिनी’ तेलाच्या सीलबंद डब्यात मेलेली घूस; बुलढाण्यात संतापाची लाट, FDA कारवाईची मागणी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला असून ‘जिमिनी’ (Gemini) कंपनीच्या १५ लिटरच्या सीलबंद खाद्यतेलाच्या डब्यात मेलेली घूस आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिओ मार्टमधून खरेदी केलेल्या या तेलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित कंपनी व विक्रेत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरातील रहिवासी शिवराज काकडे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक जिओ मार्टमधून किराणा सामानासह जिमिनी कंपनीचे तेल खरेदी केले होते. काही दिवसांनी डबा उघडताच त्यातून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. संशय आल्याने नीट पाहणी केली असता तेलाच्या डब्यात मेलेली घूस तरंगताना दिसली. विशेष म्हणजे तेलाचा रंगही रक्तासारखा लाल झाल्याचे काकडे यांनी सांगितले. या धक्कादायक प्रकारामुळे कुटुंबाच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काकडे यांनी तातडीने जिओ मार्ट गाठत मॅनेजरकडे जाब विचारला.सीलबंद डब्यात असा प्रकार होणे म्हणजे उत्पादन प्रक्रियेत गंभीर निष्काळजीपणा किंवा सुरक्षा यंत्रणेचा पूर्णपणे अभाव असल्याचे लक्षण आहे, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) करण्यात आली असून संबंधित तेलाच्या बॅचची तपासणी, नमुने जप्त करणे आणि कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना सावध राहावे, तसेच प्रशासनाने दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!