जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील चौभारा येथील शेतकरी गंगाराम शामराव ढगे (वय 75) यांच्या शेतातील लोखंडी टिनपत्राच्या शेडला अज्ञातांनी आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या आगीत दोन बैल जिवंत जळून मृत्युमुखी पडले. तसेच धान्य, शेतीसाहित्य व चाऱ्यासह सुमारे 3 लाख 4 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जुन्या शेती व धुराच्या वादातून शेजारी विठ्ठल सखाराम काळपांडे व त्याचा मुलगा योगेश काळपांडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7.30 ते 8.30 वाजण्याच्या सुमारास मुर्तीजापूर शिवारातील गट नं. 8 मधील 60×30 फुटांच्या शेडला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण शेड वेढल्याने बांधलेली बैलजोडी जळून खाक झाली. याशिवाय तूर 10 पोते, गहू, खत, स्प्रिंकलर सेट, शेती फवारणी पंप व इतर साहित्य भस्मसात झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही चाऱ्याला आग लावणे, बैल सोडून देणे अशा प्रकारांनी त्रास देण्यात आल्याचा आरोप आहे. जुन्या वादातूनच ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून परिसरात संतापाचे वातावरण आहे.दरम्यान, या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अंतर्गत कलम 3(5), 324, 326(f) व 326(g) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.










