बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील प्रलंबित जमीन महसूल, विविध कर व गौण खनिज दंडाची १०० टक्के वसुली करण्यासाठी प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महसूल यंत्रणेला स्पष्ट निर्देश देत अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांवर आक्रमक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट मालमत्ता जप्तीपर्यंत कठोर पावले उचलली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी गावोगावी जाऊन थकीत वसुली मोहीम राबवणार असून वारंवार सूचना देऊनही दंड व महसूल न भरणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तहसीलदारांना कठोर कारवाईचे पूर्ण अधिकार देण्यात आल्याने प्रशासनाची मोहीम अधिक वेगाने राबवली जाणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी थकीत जमीन महसूल, कर व गौण खनिज दंड तात्काळ भरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शासकीय महसूल हा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने सर्वांनी सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.










