बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सेवानिवृत्त बीएसएनएल लाइनमनच्या घरावर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. उकंडा गणपत नाइक (वय 63) हे पत्नीसमवेत मुलाकडे गेले असताना 1 ते 2 फेब्रुवारी दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील 55 इंच एलईडी टीव्ही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पंचधातूच्या मूर्ती, दोन पंचधातूचे हत्ती तसेच गल्ल्यातील रोख रक्कम असा सुमारे 30 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
घटनास्थळी घरातील कपाटे व किचनमधील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किनगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका अनिल नागरे करत आहेत. वारंवार होत असलेल्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची जोरदार मागणी केली आहे.










