मलकापूर (हॅलो बुलडाणा) मलकापूर-बुलढाणा मार्गावरील निंबारी फाटा पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला असून दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत राजूर येथील ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मुक्ताईनगर येथील युवक गंभीर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देत आहे. सोमवारी (२ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास राजवीर पेट्रोल पंपासमोर हा रक्तरंजित अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील डिलक्स फर्निचरमध्ये कारपेंटर म्हणून काम करणारे शेख जावेद शेख हनीफ (वय ३५, रा. राजूर) हे काम आटोपून एमएच-२७-के-४३९५ या दुचाकीवरून राजूरकडे निघाले होते. त्याचवेळी दाताळाकडून मलकापूरकडे येणाऱ्या एमएच-१९-सीएच-६०२ या दुचाकीवरील सागर सुधीर झांबरे (वय ३६, रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांच्या वाहनाशी त्यांची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही चालक हवेत उडून रस्त्यावर फेकले गेले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती शेख जावेद यांना मृत घोषित केले, तर सागर झांबरे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून निंबारी फाट्यावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.










