बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेज नंबर 309 येथे आज दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास वेगाचा कहर पाहायला मिळाला. होंडा सिटी कार थेट डिव्हायडरला धडकली आणि काही क्षणांतच महामार्गावर भीषण दृश्य निर्माण झाले. या अपघातात कारमधील पाचही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त वाहन होंडा सिटी (MH 01 BU 9995 माहितीप्रमाणे) असून त्यात एकूण पाच जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली, हेच या घटनेत दिलासादायक ठरले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पिसे, पायलट प्रदीप पडघाण, पवन गाडेकर, गोपाल वानखेडे तसेच डॉ. मंगेश काळे आणि पायलट पांचाळ यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने मेहकर येथील सहयोग हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून सर्वांवर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार अतिवेग आणि नियंत्रण सुटणे हे अपघाताचे मुख्य कारण मानले जात आहे. समृद्धी महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांनी प्रशासनाच्या सुरक्षिततेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.










