spot_img
spot_img

ग्रामस्थ आले अन् BDO पळाल्या! देऊळघाट प्रकरणात चौकशी सिद्ध, आदेश लेखी… तरीही कारवाई शून्य; कुणाच्या आशीर्वादाने दोषी मोकाट?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) चौकशीत दोषी आढळूनही ग्रामसचिव व सरपंचावर तब्बल दोन वर्षांपासून कोणतीही कारवाई न झाल्याने देऊळघाट ग्रामपंचायतीतील नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला आहे. आज सकाळी ११ वाजता बुलढाणा गट विकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ कार्यालयात धडकले असता, ग्रामस्थांना पाहताच गट विकास अधिकारी अमिता अजित पवार यांनी कार्यालय सोडून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायतीत १५व्या वित्त आयोगातील निधी ग्रामसचिव रजेवर असतानाही सरपंच व सचिव यांनी संगनमताने अवैधरित्या काढून खर्च केल्याचा गंभीर आरोप आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर झालेल्या चौकशीत आरोप सिद्ध झाले. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषी ग्रामसचिव व सरपंचावर कारवाई करण्याचे लेखी आदेश गट विकास अधिकाऱ्यांना दिले. मात्र, हे आदेश धूळखात पडून राहिले असून आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

याच प्रशासनिक दिरंगाई आणि संरक्षणामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीतही गेल्या आठ तासांपासून ग्रामस्थ दालनात ठामपणे ठिय्या देऊन बसले आहेत. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि गट विकास अधिकारी कार्यालयात येऊन जाब देत नाहीत, तोपर्यंत ठिय्या सुरूच राहील, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

चौकशी अहवाल, लेखी आदेश असूनही कारवाई न होणे आणि अधिकाऱ्यांचे पलायन हे प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. आता जिल्हा प्रशासन याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करणार का, की दोषींना अभय देण्याची परंपरा कायम राहणार, असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!