spot_img
spot_img

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलश यात्रेने बुलढाणा जिल्ह्यात भावनिक लाट; 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान दर्शन सोहळा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, सामान्य जनतेचे खंदे नेतृत्व आणि लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या पवित्र अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात 3 ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अत्यंत भावनिक वातावरणात पार पडणार आहे. जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक इतिहासात अजरामर ठरणारी ही अस्थिकलश यात्रा जनतेच्या अश्रूंनी आणि आठवणींनी भारलेली ठरणार आहे.

आज मंगळवारी ऍड. नाझेर काझी साहेब अमरावती येथून पवित्र अस्थिकलश घेऊन सिंदखेड राजा येथे दाखल होणार असून, जिजाऊ जन्मस्थानासमोर या यात्रेला भावपूर्ण सुरुवात होणार आहे. त्यानंतर लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, वरवट बकाल, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मोताळा, बुलढाणा, चिखली आणि देऊळगाव राजा येथे अस्थिकलश दर्शनासाठी जनसागर उसळणार आहे.

या संपूर्ण पवित्र यात्रेमध्ये माजी मंत्री व ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, आमदार मनोज कायंदे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.

लोकनेते स्व. अजितदादांचे सर्वसामान्यांवरील प्रेम, विकासाभिमुख निर्णय आणि निर्भीड नेतृत्व आजही जनतेच्या हृदयात जिवंत आहे. ही अस्थिकलश यात्रा म्हणजे केवळ श्रद्धांजली नव्हे, तर त्यांच्या विचारांना पुन्हा एकदा जनतेच्या मनात जागवणारा ज्वलंत संदेश आहे.

5 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता संत चोखामेळा सागर (खडकपूर्णा) प्रकल्प येथे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, पत्रकार बांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!