बुलढाणा (हॅलो बुलडाणा) प्रजासत्ताक दिनी शहरात एक खळबळजनक प्रकार घडला. मेहकर तालुक्यातील मोहना बुजुर्ग येथील वैभव करे या युवकाने ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात थेट ३०० फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून आक्रमक आंदोलन केले. भ्रष्ट लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा खाली उतरणार नसल्याचा इशारा त्याने दिला. टॉवरवरून जोरदार घोषणाबाजी करत त्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दांत टीका केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल व आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून युवकाला सुरक्षित खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.










