बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या संत गाडगेबाबांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नगरात आज घाणीचे साम्राज्य पसरले असून, सुंदरखेड ग्रामपंचायत परिसरातील भयावह वास्तवाने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या भागात काही धनदांडग्यांनी नियमबाह्य अतिक्रमण करत सार्वजनिक जागा अक्षरशः बळकावल्या असून, कचरा, सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे परिसर राहण्यायोग्य राहिलेला नाही.
या अस्वच्छतेचा थेट फटका लहान विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ महिला-पुरुष ग्रामस्थांच्या आरोग्यावर बसत आहे. डासांचा प्रादुर्भाव, साथीचे आजार, दुर्गंधी व रोगराई यामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाही ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
विशेष म्हणजे, बुलढाणा जिल्ह्यातील श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या सावळा-सुंदरखेड ग्रामपंचायत भागात अशी दयनीय अवस्था असणे हे प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. सोशल मीडियावर या घाणीची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली जात आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही स्वच्छता मोहीम केवळ कागदावरच राबवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. जर तात्काळ अतिक्रमण हटवून स्वच्छता अभियान राबवले नाही, तर ग्रामस्थ लोकशाही मार्गाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह छेडण्याच्या तयारीत आहेत.












