बुलढाणा (हॅलो बुलढाणा- प्रशांत खंडारे) पाऊसधारांत सचैल स्नान करून सध्या सृष्टीनं नव्यानं कात टाकलेली आहे.हिरवाई..वेलीवरची फुले.. पंख झाडणारे पक्षी.. भिजलेली झाडं.. मध्येच पडणारा रिमझिम पाऊस..आपल्याकडे कौतुक, लाड आणि सेलिब्रेशन असतं! अशात निसर्ग सौंदर्याने बहरलाय तो राजुर घाट!
शहराला लागून असलेल्या बुलडाणा -मलकापूर रस्त्यावरील राजूर घाटाने हिरवा शालू पांघरलेला आहे. पाऊस बऱ्यापैकी झाला नाही तरीसुद्धा परिसरातील विविध मंदिरे, नदी, नाल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात आणखी भर पडणारआहे.त्यामुळे तूरळक का होईना, खास सुटी काढून परिसरातील पर्यटनप्रेमी निसर्गाचा आनंद लुटताना दिसून येत आहेत.अजिंठ्याच्या डोंगरात वसलेल्या बुलडाणा शहर परिसराला अलैकिक सौंदर्याच देणं लाभलं आहे. त्यामुळे इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात येथूनच जिल्ह्याचा कारभार सुरू केला होता. दरम्यान स्वातंत्र्यानंतर बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा मिळाला. आजरोजी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी शहर परिसरात असलेले नैसर्गिक सौंदर्य दरवर्षी परिसरातील पर्यटक प्रेमींना खुणवत असते.
▪️ काय काय आहे पाहण्यासारखे?
बुलडाणा शहरातून मलकापूरकडे जात असताना सर्वप्रथम व्यंकटगिरी बालाजीचे मंदिर आहे. तिरूमला येथील बालाजीची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली. या परिसरात डोंगर आहेत. राजूर घाटात एका वळणावर संकटमोचन हनुमान मंदिर आहे. या ठिकाणाहून बुलडाणा शहर परिसर तसेच राजूर घाटातील डोंगराचे सौंदर्य निहाळता येते. त्यानंतर मोताळा तालुक्यातील राजूर गावाकडे जाताना घाटातच दुर्गामाता मंदिर आहे.या परिसरात खोल दरीतील पाणी, साठवलेला नाला, सर्वत्र डोंगराने पांघरलेला हिरवा शालू तसेच मोताळा शहरासमोर असलेल्या नळगंगा धरणाचे पाण्याचे विशाल पात्र निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घालते. या ठिकाणाहून सुर्येदय तसेच सुर्यास्तचे दर्शन घेताना वेगळी अनुभुती मिळते. त्यानंतर मोहेगाव समोर असलेल्या तालुका पर्यटन केंद्र तसेच त्यापुढे असलेल्या जमिनीखाली 15 फुट खोल असलेल्या महादेवाचे मंदिर आहे. या परिसरात नळगंगा नदीचे वाहणारे पाणी, परिसरातील हिवराई मनाला सुखावून जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात बुलडाणा शहर परिसरातील अजिंठ्याच्या डोंगरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना हाक देत असते. या ठिकाणी इतर जिल्ह्यातील येणारे पर्यटकांनी भेट दिल्यास परत परत येथील निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही.
▪️ येथे लूटता येतो निसर्गाचा आनंद..
बुलडाणा शहरालगत असलेल्या वनविभागाचा सनसेटपॉईंट व्यंकटगिरी, राजूर घाटातील, संकटमोचन हनुमान, बुलडाणा अर्बन सनसेट पॉईंट दुर्गामाता मंदिर, राजूर येथील महादेव मंदिर, खामखेड जवळ अणारे नळकुंड येथे पर्यटक भेट देवून निसर्गाचा आनंद घेत असतात.