spot_img
spot_img

मिशन वासल्य यशस्वी… पण शेतकऱ्यांची भीती वाऱ्यावर?

मेहकर (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील घाटबोरी वनपरिक्षेत्रात राबविण्यात आलेले ‘मिशन वासल्य’ अखेर यशस्वी झाले. कळंबेश्वर शेतशिवारात 31 डिसेंबर रोजी आढळलेल्या बिबट्याच्या पिल्लाला त्याच्या आईशी पुन्हा एकत्र करण्यात वन विभागाला यश आले. 1 जानेवारी 2026 रोजी रात्री 7.10 वाजता मादा बिबट्याने आपल्या पिल्लाला कुशीत नेले ही घटना वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाची आहे

घटनेच्या दिवशी मादा व नर बिबट्याला तोंडात पिल्लू घेऊन शेतकऱ्याला धक्का देत पळताना पाहिले गेले होते. म्हणजेच हा परिसर हाय रिस्क झोन असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. वन विभागाने पिल्लू-माता मिलनावर लक्ष केंद्रित केले, पाऊलखुणा शोधल्या, सर्च ऑपरेशन राबवले हे सारे झाले. पण त्याच वेळी शेतकरी, मजूर, महिला आणि लहान मुले यांची सुरक्षितता दुय्यम ठरली का?

आजही कळंबेश्वर, दुधा, कासारखेड परिसरातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. रात्री तर घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले आहे. पिके उभी आहेत, जनावरे गोठ्यात आहेत, पण भीतीच्या सावलीत शेती कशी करायची? बिबट्याचे पिल्लू आईकडे गेले छान पण बिबट्या शिवारातच आहे, ही वस्तुस्थिती कोण नाकारू शकते?

वन विभागाने आता पुढचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. सतत गस्त, ट्रॅप कॅमेरे, रात्री पेट्रोलिंग, जनजागृती, आणि गरज भासल्यास बिबट्याचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर या उपाययोजना तातडीने राबविल्या पाहिजेत. केवळ ‘मिशन यशस्वी’ अशी घोषणा करून मोकळे होता कामा नये.
वन्यजीव संवर्धन महत्त्वाचेच आहे, पण शेतकऱ्यांचा जीव त्याहूनही महत्त्वाचा आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!