spot_img
spot_img

💥EXCLUSIVE १०६ वर्षे नॉट आऊट! निसर्गाने घडवलेली मेहकरची ‘नानी’

मेहकर (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) आजच्या धकाधकीच्या युगात साठरी- सत्तरीतच आजारांनी हैराण होणारी पिढी असताना, जिल्ह्यातील मोहना बुद्रुक (ता. मेहकर) येथील रामीबाई गोबरा चव्हाण यांनी तब्बल १०६ वर्षांची शतकी खेळी ‘नॉट आऊट’ राहून पूर्ण केली आहे. वय हा फक्त आकडा असतो, हे नानींनी आपल्या ठणठणीत तब्येतीने पुन्हा एकदा ठासून सिद्ध केले आहे.

टूथपेस्ट, ब्रश, मल्टिव्हिटॅमिन्स आणि महागड्या उपचारांच्या जमान्यात नानींची जीवनशैली म्हणजे आधुनिक पिढीसाठी थेट आरोग्याचा धक्का देणारी वास्तवाची चपराक आहे. आजही त्या दररोज सकाळी कडुनिंबाच्या काडीने दात घासतात. कृत्रिम रसायनांऐवजी निसर्गावरचा अढळ विश्वास हेच त्यांच्या मजबूत दातांचे आणि निरोगी हिरड्यांचे गुपित आहे. इतकेच नव्हे तर शरीर शुद्धीसाठी त्या नियमितपणे कडुनिंबाच्या पानांचा रस घेतात. कडू पण गुणकारी निसर्गोपचारांनीच आजारांना दूर ठेवले असल्याचे त्या ठामपणे सांगतात.

१०६ व्या वर्षातही नानी कोणावरही अवलंबून नाहीत. स्वतःची दैनंदिन कामे त्या आजही स्वाभिमानाने करतात. औषधांच्या गोळ्यांपेक्षा श्रम, शिस्त आणि साधेपणा यांवर विश्वास ठेवणाऱ्या नानींचे आयुष्य म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी जिवंत प्रेरणादायी धडा आहे.

नानींच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांनी जल्लोषात आनंद साजरा केला. नानींचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहावेत, अशी भावना व्यक्त करण्यात आली. मेहकरपासून संपूर्ण जिल्ह्यात नानींच्या दीर्घायुष्याची चर्चा रंगत असून, त्यांच्या नैसर्गिक सवयींवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!