देऊळगावराजा (हॅलो बुलडाणा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर देऊळगावराजात राजकारणात अक्षरशः भूकंप झाला! कट्टर प्रतिस्पर्धी, परस्परांविरुद्ध अनेक वर्षे राजकीय आघाड्यांवर लढणारे दोन दिग्गज माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी आज अनपेक्षितपणे हातमिळवणी करत ‘नगरविकास आघाडी’ची घोषणा केली. हे दृश्य पाहून संपूर्ण शहरासह राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा धडधडाट सुरू असतानाच दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही युती जाहीर केली. राष्ट्रवादी (अजित पावर गट) जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्या रणनीती विरुद्ध ही खेळी आखली गेल्याची चर्चा सर्वत्र आहे.नुकतेच शरद पवार गटातील ठरलेले महत्त्वाचे उमेदवार अजितदादांच्या गटाने खेचून आणल्यानंतर विरोधकांकडे उमेदवाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच आजची ही जुळवाजुळव राजकारणाला नवीन वळण देणारी ठरली.
डॉ. शिंगणे यांनी पवार साहेबांनी दिलेल्या सूचनेचा उल्लेख करत सांगितले, “भाजप सोडून कोणाशीही युती करा, असे पवार साहेबांनी स्पष्ट सांगितले. जातपात नव्हे, विकास साधणारे नेतृत्व जनतेने निवडावे.”
या आघाडीत डॉ. शिंगणे, डॉ. खेडेकर, भाग्यश्री खेडेकर, तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, शिवसेना शहर अध्यक्ष गोपाळ व्यास, राष्ट्रवादी नेते गणेश सवडे, आतिष कासारे, हनीफ शाह, मोरेश्वर मीनासे, जगदीश कापसे, सुनगत आदींचा समावेश असून “नगरविकास आघाडी” औपचारिकरित्या स्थापन करण्यात आली आहे.











