मुंबई (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्राच्या राजकारणात आज अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले! वर्षानुवर्षे वेगवेगळ्या मार्गाने चाललेले ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर एकत्र आले आणि मंत्रालयात एकत्र पाऊल टाकताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे! मतदार यादीतील त्रुटी, प्रभाग रचना आणि इतर निवडणूक प्रक्रियांवर आक्षेप घेण्यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयुक्तांच्या भेटीस गेले. या शिष्टमंडळात राज ठाकरे स्वतः उपस्थित होते. मंत्रालयात दाखल होताना उद्धव आणि राज ठाकरे एकाच कारमधून प्रवास करताना दिसले
या भेटीपूर्वी ठाकरे गटाचे कार्यालय ‘शिवालय’ येथे उद्धव, राज आणि आदित्य ठाकरे यांची छोटी पण महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर हे तिघे मंत्रालयाकडे रवाना झाले. मंत्रालयाच्या पायऱ्यांवर राज ठाकरे पुढे, मागे उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामागोमाग आदित्य ठाकरे असा देखणा पण ऐतिहासिक क्षण साकारला!
याच वेळी आणखी एक बुलंद क्षण बुलढाणा जिल्ह्याच्या दृष्टीने घडला मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात ठाकरे बंधूंच्या मागे मंत्रालयात चालताना दिसले! बुलढाण्यातील शिवसैनिकांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. ठाकरे बंधूंच्या सोबत आमदार खरात यांची उपस्थिती हे केवळ राजकीय नव्हे तर प्रतीकात्मक शक्तीचे दर्शन मानले जात आहे.
राज-उद्धव यांच्या या ऐतिहासिक एकत्र येण्याने महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची पायाभरणी झाली असून, आगामी निवडणुकांच्या तोंडावर ही भेट महाविकास आघाडीच्या राजकारणाला नवा वेग देणारी ठरत आहे!