spot_img
spot_img

💥EXCLUSIVE बुलढाण्यात बोगस मतदारांचा भस्मासूर! सत्ताधारी भाजपकडूनच यादी पुराव्यानिशी सादर – जयश्री शेळके यांच्या आरोपांची पुष्टी?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा/जितेंद्र कायस्थ) बुलढाण्यात बोगस मतदारांचा भस्मासूर उघड झाला आहे! आणि आश्चर्य म्हणजे ही यादी कोणी दिली तर सत्ताधारी भाजपनेच — तीही ठोस पुराव्यानिशी! भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी ४ ऑक्टोबर रोजी सहपालक मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

निवेदनानुसार, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात तब्बल ३,५४६ बोगस मतदार पुन्हा नोंदवले गेले असून, बुलढाणा शहरात सुमारे ८०० मतदारांची पुनरावृत्ती झाली आहे. काही मृत व्यक्तींची नावेही आजतागायत मतदार यादीत असल्याचे उघड झाले आहे. या यादीतील नाव, वय आणि पत्ता यांचे सूक्ष्म परीक्षण केल्यावर ‘पुनरावृत्ती मतदार नोंदणी’चे पक्के पुरावे मिळाले आहेत.

भाजपकडूनच हा दस्तऐवज समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत झालेल्या बोगस मतदानाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या आणि बुलढाणा विधानसभेच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी केलेल्या आरोपांनाच या निवेदनामुळे आता पुष्टी मिळत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संताप असून,निवडणूक आयोगाने बुलढाण्यात तात्काळ चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे. भाजपकडून बोगस मतदारांची यादी सादर होणे म्हणजे राजकीय भूमिकेतले मोठे उलथापालथीचे संकेत मानले जात आहेत. जयश्री शेळके यांचा पराभव खरोखर जनतेने केला की ‘बोगस मतदारांनी’? हा प्रश्न आता बुलढाण्याच्या प्रत्येक सुज्ञ नागरिकाच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!