देऊळगावराजा (हॅलो बुलडाणा) नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत देऊळगावराजा नगरपरिषदेसाठी “अनुसूचित जाती (महिला)” वर्ग राखीव ठरल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. यामुळे अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय गणित कोलमडले असून, नव्या चेहऱ्यांसाठी संधीची दारे खुली झाली आहेत. या आरक्षणामुळे पारंपरिक गट-तटांची समीकरणे मोडीत निघाली असून, राजकीय नेत्यांमध्ये उमेदवार शोधण्याची लगबग सुरू झाली आहे.
गेल्या काही काळापासून देऊळगावराजात नगराध्यक्षपद कोणत्या वर्गासाठी राखीव ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर आरक्षण जाहीर होताच विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली, तर काहींनी महिलांच्या सशक्तीकरणाचा विजय असल्याचे म्हटले. स्थानिक पातळीवर आता नव्या चेहऱ्यांची चर्चा रंगली असून, सामाजिकदृष्ट्या कार्यरत महिलांना मोठी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.