मुंबई (हॅलो बुलढाणा) राज्यात निवडणुकीचा बिगुल वाजण्यास आता काहीच दिवस शिल्लक! जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीनंतर आता नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी मंत्रालयात जाहीर होणार आहे. या सोडतीदरम्यान मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यासाठी पत्रे पाठविण्यात आली असून, निवडणूकपूर्व हालचालींना वेग आला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर पार पडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. निवडणूक आयोगाने सर्व प्रशासकीय प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केल्या असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत काढली जाणार आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदांमधील 336 पंचायत समित्यांच्या सदस्यपदाचे आरक्षण त्या दिवशी ठरणार आहे. त्यावर हरकती व सूचनांची अंतिम मुदत 17 ऑक्टोबरपर्यंत ठेवण्यात आली असून, 3 नोव्हेंबरला अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होईल.
दरम्यान, राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाणार असून, अंतिम यादी 28 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल. या निवडणुकांसाठी विधानसभा मतदार यादीच वापरण्यात येणार आहे.राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांनी आपापल्या गोटात रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या प्रकाशातच आता राजकीय रणसज्जतेचा झगमगाट दिसणार आहे