spot_img
spot_img

रविकांत तुपकरांनी सरकारवर वर्ध्यात डागली तोफ! – हजारो शेतकऱ्यांचा निघाला मोर्चा!

बुलढाणा/वर्धा (हॅलो बुलढाणा) वर्धा शहरात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. बजाज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या या मोर्चात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत हक्कासाठी लढा सुरू केला.यावेळी तुपकरांनी सरकारवर तूफान हल्ला चढविला.

ओला दुष्काळ जाहिर करून पूर्ण भरपाई द्या,हक्काची कर्जमुक्ती, सोयाबीन कापसाला रास्त भाव,यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या घेऊन हा प्रचंड आक्रोश मोर्चाने वर्धा शहर दाणाणून सोडले.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तुपकरांनी सरकारवर थेट हल्लाबोल करतांना म्हटले, “शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. पिके वाहून गेली आहेत, जमीन खरडली आहे, शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. मुख्यमंत्री निवडणुकीपूर्वी म्हणाले होते सातबारा कोरा करू,पण आता म्हणतात योग्य वेळ आली की कर्जमाफी करू. हीच खरी वेळ आहे, यापेक्षा खरी वेळ कोणती?”
तुपकरांनी आंदोलकांना उद्देशून सांगितले की सरकारच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्येच्या खाईत ढकलला गेला आहे. “दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो,मुला मुलींची लग्न जमत नाही, म्हातार्‍या बापाला दवाखान्यात नेण्यासाठी पैशांची सोय नाही. हे दृश्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला. यावेळी सोयाबीनला भाव मिळावा म्हणून सोयापेंड निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा, पोल्ट्री लॉबीचा दबाव झुगारावा, कापसावर पुन्हा आयात शुल्क लावावे, दोन हेक्टरची अट हटवून सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत द्यावी, अशा ठोस मागण्या मांडण्यात आल्या. तुपकरांनी सरकारला इशारा देताना सांगितले की, “पंधरा दिवसांत ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू. वर्धा आंदोलनाचे केंद्र राहील. पोलीसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील, पण शेतकऱ्यांच्या छात्या कमी पडणार नाही.”
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही शेतकऱ्यांनी शांततेत आपली भूमिका मांडली.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख किरण ठाकरे यांच्या पुढाकारातून या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!