बुलढाणा (हॅलो बुलडाणा) MPDA कायदा ज्याचा अर्थ महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा असा आहे, हा कायदा आता राज्यातील वाळूतस्करांवर लागू होणार आहे. त्यामुळे या कायद्याअंतर्गत तात्काळ कारवाया करा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच बुलढाण्यात दिले होते. बावनकुळे यांच्याकडून बुलढाण्यात हा आदेश देण्यामागे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. बावनकुळेंचा निशाणा नेमका कुणावर, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
बुलढाण्यात आले असता मंत्री बावनकुळे यांनी वाळूची अवैध वाहतूक व विक्री करणा-यांवर तात्काळ कठोर कारवाई करा. एव्हढेच नाही तर कोण्याही आमदार-खासदार लोकप्रतिनिधीचा जरी फोन आला तरी कुणाचेही ऐकू नका, असे कठोर निर्देश जिल्हाधिक-यांपासून ते महसूलच्या इतर अधिका-यांना दिले. त्यांच्या या वक्तव्याचे आता अनेक अर्थ काढले जात आहेत.थोडे इतिहासात जाऊन पाहिल्यास सुमारे 15 वर्षांपूर्वी बुलढाण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक देशभ्रतार हे होते. त्या वेळी त्यांनी वाळूचे अवैधरित्या उत्खनन वाहतूक व गुंडगिरी केल्या प्रकरणी एका लोकप्रतिनिधींवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी शिफारस केली होती. त्या वेळी संबंधित लोकप्रतिनिधी महोदयांनी तत्कालीन गृहमंत्री आबा पाटील यांची सोबत असल्या कारणाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, तसेच तत्कालीन गृहमंत्र्यांनी संबंधित आमदारास वाचवले आहे, असा आरोप तेंव्हा देखील होत होता.
ज्यांच्यावर बावनकुळे यांचा निशाणा आहे, त्या व्यक्तीचे भाजपच्या विद्यमान नेत्यांशी अगदी विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. सातत्याने भाजपच्या नेत्यांशी पंगे घेणे हे संबंधित आमदाराचे नित्याचेच बनले आहे. भाजप-शिवसेना हे मित्रपक्ष असून देखील सातत्याने आम्हाला संबंधित लोकप्रतिनिधी डावलतो आहे, असा आरोप भाजपचे नेते करीत असतात.या संपूर्ण स्थितीत असाही आरोप आहे की, संबंधित लोकप्रतिनिधी आणि त्यांचे काही सहकारी हे मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा करणे व वाळूची अवैधरित्या वाहतूक करणे असे प्रकार करीत आहेत. त्यासाठी अनेक प्रकारच्या तिकडमबाज्या केल्या जात असल्याचा आरोपही भाजप नेते व कार्यकर्त्यांचा आहे.
या एकंदर परिस्थितीत आगामी काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील ब-याच नगरपालिका, पंचायत समित्यांची निवडणूक आहे. संबंधित लोकप्रतिनिधी हा बुलढाणा नगरपालिकेवर आपलाच झेंडा फडकावण्याचा प्रयत्न जोरदारपणे करीत आहेत. भाजपच्या अंतर्गत गोटात आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत अत्यंत गांभीर्याने चर्चा सुरू आहे. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी हा भाजपवर सातत्याने दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची खुमासदार चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
बावनकुळे यांनी जे काही कठोर आदेश दिले आहेत, त्यातून संबंधित आमदारावर कुठेतरी शिकंजा कसण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. कारण एमपीडीए नुसार कारवाई झाल्यास संबंधित आमदारावर कठोर कारवाई होईल व त्यातून भाजपला त्या आमदाराचा होणारा त्रास कमी होईल, असा होरा भाजप नेत्यांचा असावा. काहीही असले तरी संबंधित लोकप्रतिनिधीच्या मित्रपक्षांसाठी असलेल्या कुरापती कमी झाल्या नाही तर कुरापतींना उत्तर महाकुरापतींनीच दिले जाईल, असा प्रतीकात्मक इशारा या निमित्ताने भाजप देत तर नाही ना, अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे.