शेगाव (हॅलो बुलडाणा) सौंदर्य, आत्मविश्वास आणि अपार मेहनतीच्या जोरावर जागतिक मंचावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शेगावच्या गायत्री रोहनकर हिला प्रतिष्ठित ‘हिंदुस्तान रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई ग्लोबल आणि मुंबई इव्हेंट कंपनीतर्फे 18 जुलै रोजी मुंबईत झालेल्या भव्य समारंभात हा पुरस्कार देण्यात आला.या सोहळ्यात प्रख्यात गायक उदित नारायण यांच्या हस्ते, तसेच फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज राजकुमार तिवारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गायत्रीला गौरविण्यात आले. तिच्या पुरस्कार स्वीकाराच्या क्षणी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात निनादले. गायत्रीच्या यशाला उपस्थितांनी उभे राहून सलाम केला.
गायत्री रोहनकरने नुकतेच दुबई येथे झालेल्या ‘मिस एशिया वर्ल्ड 2025’ स्पर्धेत विजेतेपद पटकावून भारताच्या सौंदर्य आणि प्रतिभेची पताका उंचावली आहे. आत्तापर्यंत तिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 18 सौंदर्य स्पर्धांमध्ये विजेतेपदाची शर्थ गाठली आहे.
शेगावसारख्या छोट्या शहरातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेतलेल्या गायत्रीने आपल्या कार्याने देशभरातील तरुणींना प्रेरणा दिली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा अभिमान वाढला असून, सोशल मीडियावरही तिच्या कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.