बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मोताळा तालुक्यातील जयपुर येथील अवैध सावकाराच्या घरी सहकार विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात छापा घातल्याने अवैध सावकाराचे धाबे दणाणले आहे.
जिल्हाधिकारी किरण पाटील , पोलीस अधीक्षक निलेश तांबे , बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था) महेंद्र चव्हाण यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. जी. जे. आमले, सहायक निबंधक, सहकारी संस्था तालुका मोताळा यांच्या पथकाने आज १७ जुलै रोजी विभागास प्राप्त तक्रारीनुसार हा छापा घातला.या कारवाई मध्ये कोरे बॉण्ड, कोरे धनादेश, हिशोबाची गुप्त नोंद असलेली वही असा दस्तावेज आणि तब्बल पाच मोबाईल जप्त करण्यात आले. मोबाईल बद्धल समाधानकारक खुलासा करू न शकल्याने पाच मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आले. यामुळे अवैध सावकारीचा काळा धंदा करणाऱ्यांसाह संपूर्ण मोताळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मोताळा तालुक्यातील जयपूर गावातील संदीप विनायक देशमुख यांच्या राहत्या घरी अवैध सावकारी अनुषंगाने धाड टाकण्यात आली. सदर धाड अवैध सावकारी व्यवहारांतर्गत जिल्हा निबंधक (सावकरी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बुलढाणा यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे व महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.या कारवाई मध्ये घरातील झाडाझडतीमध्ये कोरे बॉण्ड, तसेच विविध प्रकारचे विविध बँकेचे, विविध व्यक्तींचे एकूण ६१ प्रकाराचे सही केलेले कोरे चेक आढळून आले. त्याप्रमाणे एक वही आढळून आली अवैध सावकारी संबंधाने नोंदी केलेली एक वही पथकाच्या हाती लागली. याशिवाय कारवाईत एकूण पाच प्रकारचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आढळून आले. सदर मोबाईल अवैध घरी कोणत्या कारणाने ठेवले याचा खुलासा संदीप देशमुख करू शकले नाही. त्यामुळे सदर मोबाईल अधिक तपासाकरिता जप्त करण्यात आले.
सहकारी विभागाच्या पथकाच्या अवैध सावकाराच्या झाडाझडतीमध्ये मिळालेले सर्व दस्तऐवज पुढील तपासा करिता जप्त करण्यात आले आहे. पथक प्रमुख जी. जे. आमले, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तालुका मोताळा, पथक सहाय्यक यु. के. सुरडकर एस. के. घाटे, वाय एम घुसळकर, आर. ए. डहाके, एन एस सोनवणे, पी. व्ही. किकराळे यांचा पथकात समावेश होता. तसेच पंच म्हणून मोताळा तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी सदानंद हिवाळे, आणि गोपाल सिंग राजपूत, महसूल अधिकारी, यांनी काम बजावले. जिल्हा पोलीस दलातील पोलीस जमादार मोहिनी हावरे, पोलीस जमादार रामप्रसाद डोळे आदीनी बंदोबस्त पुरवीला.
▪️’पुराव्यासह तक्रारी करा!’
अवैध सावकारीच्या अनुषंगाने अधिक पिळवणुक करणा-या अवैध सावकारांच्या तक्रारी सबळ पुराव्यासह प्राप्त झाल्यास अशा सावकारांवर महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार चौकशी करुन अवैध सवाकारी सिध्द झाल्सास फौजदारी स्वरुपाची कारवाही करण्यात येते. या संदर्भात जिल्हा निबंधक, (सावकारी) बुलडाणा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था जि जे. आमले यांनी केले आहे.