बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हयात जंगल व्याप्त परीसर असल्याने अलीकडे बिबट्यांची संख्या वाढत आहे.मात्र बिबट अन्न पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे किंवा रस्त्यांवर येत असल्याने त्यांच्यासह मानवी जिवाला धोका निर्माण झालाय. अशातच खामगाव तहसील अंतर्गत खामगाव-चिखली मार्गावर एका बिबट्याला वाहनाची धडक बसल्याने बिबट जागीच ठार झाला. ही घटना गणेशपूर जवळ गुरुवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली.गणेशपूर परिसराला घनदाट जंगलाचा वेढा आहे. या परिसरात वन्य प्राणी नेहमीच आढळून येतात. नेहमीप्रमाणे रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली.धडकेमुळे बिबट्याचा मृत्यू झाला. पहाटे ५:३० वाजता गस्त घालत असताना हिवरखेड पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळाली. हिवरखेड पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. काही वेळातच वन विभागाचे अधिकारी चेतन राठोड आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पंचनामा केला. त्यानंतर, तो खामगाव येथील वन विभाग कार्यालयात नेण्यात आला आणि त्याचे पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
- Hellobuldana