spot_img
spot_img

वसंत नगर येथे अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; घरकुलासाठी रेती न मिळाल्याने स्थानिकांचा रास्ता रोको!

सिंदखेड राजा (हॅलो बुलडाणा/सुरेश हुसे) वसंत नगर येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर प्रशासनाने कारवाई करत ती जप्त केली असून, सदर वाहने तहसील कार्यालयात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध रेती उपशावर अंकुश लावण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, स्थानिक प्रशासनास गुप्त माहितीच्या आधारे आज दिनांक १ जुन रोजी सायंकाळी वसंत नगर परिसरात अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसुल अधिकारी गौरख पवार, विष्णू थोरात यांच्या सह तातडीने पथकाने धाड टाकून दोन टिप्पर पकडले. दोन्ही वाहने जप्त करून तहसील कार्यालयात आणली जात असून, याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वसंत नगर आणि भोसा येथील तांड्यावरील आदिवासी नागरिकांनी घरकुल बांधकामासाठी आवश्यक रेती न मिळाल्याच्या कारणावरून मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पोहचून नागरिकांशी संवाद साधला. लवकरच घरकुलासाठी लागणारी रेती अधिकृत मार्गाने पुरवली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि रस्ता पुन्हा वाहतुकीस खुला करण्यात आला.या संपूर्ण प्रकारामुळे एकीकडे अवैध रेती वाहतुकीवर प्रशासनाचा बडगा पाहायला मिळाला, तर दुसरीकडे गरजू नागरिकांना अधिकृत मार्गाने मदत मिळावी यासाठी प्रशासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!