बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्रात नुकत्याच आटोपलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात भाजपच्या राज्य नेत्यांबरोबर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीतील माहिती समोर येऊ लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या महानगरांमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत असून, याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातही भाजप स्वबळावर रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता आहे.बुलढाणा जिल्ह्यात भाजपचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, नुकतेच निवडले गेलेले दमदार जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे व सचिन देशमुख यांनी जिल्हाभरात कार्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कार्यकर्त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, युतीमुळे नव्या लोकांना संधी मिळत नाही, महिलांचे व तरुणांचे राजकारणातले प्रतिनिधित्व खुंटते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या भाषणांमध्ये युवक व महिलांना संधी देण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्हा भाजपने आतापासूनच जोरदार तयारीला सुरुवात केली असून, यंदाच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा बुलंद होणार, अशी चिन्हे दिसत आहेत. आता भाजप युती टिकवते की स्वतंत्रपणे मैदानात उतरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.