बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘आता थांबायचं नाय.. ‘लढेंगे और जितेंगे!’ असे शेतकऱ्यांना संबोधित करत, राज्य सरकारने संपूर्ण कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासन पाळावे, न्यायासाठी रक्ताचे पाट वाहले तरी चालतील… सरकारच्या उरावर बसून कर्जमुक्ती, पिक विमा, नुकसान भरपाई घेऊ, अशी तोफ डागत रविकांत तुपकर यांनी सरकारला आगामी काळात मोठ्या आंदोलनाचा इशारा देखील दिला.
मातृतिर्थ सिंदखेडराजा येथील सावता भवनातील 27 मे रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या एल्गार मेळाव्यात संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर शेतकरी प्रश्नांवर महायुती सरकार विरोधात चांगलेच कडाडले. भर पावसात झालेल्या या एल्गार मेळाव्यात शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून यावेळी न्यायासाठी ऐल्गार पुकारण्यात आला. राष्ट्रमाता जिजाऊंना वंदन करून या मेळाव्या द्वारे त्यांनी विदर्भ दौऱ्याची सुरुवात केल्याचे म्हटल्याने एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तुपकर यांनी दिशा स्पष्ट केल्याचे दिसून आले. रविकांत तुपकर म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, 2023- 24 या वर्षातील शंभर टक्के पिक विम्याची रक्कम, पिकांची नुकसान भरपाई द्यावी, कापसाला 12 ते 15 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा, बाजारभावाच्या आधारावर शेतमालाला भाव मिळावा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असेल तर सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, शेतीसाठी लागणाऱ्या बी- बियाणे व खते योग्य दरात मिळून देण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात यासह इतर मागण्या तूपकरांनी यावेळी रेटल्या.या मेळाव्याला शेतकरी नेत्या ॲड. शर्वरीताई तुपकर यांच्यासह महाराष्ट्रातून आलेल्या शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील संबोधित केले.