बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या कथित बदलीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादळ निर्माण झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट सवाल केला आहे की, “अवैध धंदे पुन्हा सुरू करण्यासाठीच ही बदली केली का?” त्यांच्या या घणाघाती वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.२४ मे रोजी खामगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप केला. ते म्हणाले, “पोलिस अधीक्षक पानसरे यांच्या नेतृत्वात गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कडक कारवाई झाली होती. गांजा, मटका, दारू, आणि खंडणीसारख्या गुन्हेगारी प्रकरणांवर पोलिसांनी धडक दिली होती. यामुळे अनेकांचा गैरव्यवसाय बंद पडला. त्यामुळेच काही सत्ताधारी आमदार अस्वस्थ झाले होते.”
सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करत म्हटले की, “जर बदलीचा निर्णय राजकीय दबावामुळे घेतला गेला असेल, तर तो लोकशाही आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.”या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांची गोची झाली असून, जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. पानसरे यांची बदली नेमकी कोणत्या कारणास्तव झाली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, सपकाळ यांच्या आरोपामुळे हा विषय आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.