चिखली (हॅलो बुलडाणा) अजून पावसाळा सुरू देखील झाला नाही.अवकाळी पावसानेच कव्हळा ते चिखली खामगाव रोड फाट्या पर्यंतच्या डांबरी मार्गाचे पितळ उघडे पाडले आहे. या मार्गाला एक वर्ष देखील झाले नाही तरी सुद्धा या रस्त्याची पूरती वाट लागल्याने रस्ते कामात किती भ्रष्टाचार झाला असेल? हा कमिशन मधील टक्केवारीचा परिणाम?तर नाही ना? याची चर्चा आता रंगू लागली आहे.
रस्ते विकासाच्या वाहिन्या मानल्या जातात.शासन शहर ते गाव खेड्यापर्यंत रस्त्याचे जाळे विणत आहे.परंतु काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचा दर्जा राखला जात नसल्याची शोकांतिका आहे.चिखली तालुक्यातील कव्हळा ते चिखली खामगाव रोड फाट्यापर्यंत चा डांबरी मार्ग गेल्या वर्षी करण्यात आला होता.मात्र या रस्ते कामातील गुणवत्ता टिकून राहिली नाही. सध्याच या रस्त्याची चाळण झाली असून मोठमोठे भागदाड पडल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजायला मार्ग नसल्याने नागरिक जीव मुठीत धरून मार्गक्रमण करत आहेत.शासन कामावर करोडो रुपये खर्च करते पण दर्जेदार काम का होत नाही?कॉलिटी कंट्रोल काय करते?इंजिनीयर काय करतात? बांधकाम विभाग काय करतो? कुंपणच शेत खात आहे का? लोकप्रतिनिधी काय करतात? याबाबत आता खाजगीत उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे.