लोणार (हॅलो बुलडाणा) – “मागेल त्याला कर्जमाफी द्या, मागेल त्याला पिक विमा द्या!”या प्रचंड घोषणा देत हजारो शेतकऱ्यांनी आज लोणार तहसील कार्यालयावर धडक दिली. कर्जमुक्ती आणि अपूर्ण पिक विमा यासाठी ‘किसान ब्रिगेड’ व ‘शेतकरी योद्धा कृती समिती’च्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.दुपारी १२ वाजता पंचायत समितीपासून सुरू झालेल्या या मोर्चात प्रचंड जनसागर उसळला. मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत थेट तहसीलदारांना निवेदन दिलं. “राज्य सरकारने फक्त घोषणा केल्या, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी योद्धा श्री. बालाजी सोसे यांनी दिली.
या मोर्चामध्ये प्रत्यक्ष शेतकरी स्वतः कर्जमाफीसाठीचे फॉर्म भरून दाखल झाले. पावसाळ्यापूर्वी कर्जमाफी आणि विमा न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.किसान ब्रिगेडचे प्रकाश पोहरे आणि कृती समितीचे नेते दिलीप चौधरी, गजानन जायभाये यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. उन्हाच्या तडाख्यातही शेतकऱ्यांची लढाई थांबली नाही.
सर्व राजकीय पक्षांना झेंडे बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचे आवाहन नेत्यांनी केलं आहे. प्रशासनाने मोर्चासाठी पाणी आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी, अशीही स्पष्ट मागणी निवेदनात करण्यात आली.