मलकापुर (हॅलो बुलडाणा) शहर पोलिसांनी आज दुपारी धडाकेबाज कारवाई करत बुलढाणा रोडवरील बोदवड नाका येथे चेकिंग दरम्यान एका सिल्वर रंगाच्या इर्टीगा कारमधून तब्बल १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही कार MH20 GV-1781 क्रमांकाची असून, त्यामध्ये दोघे इसम औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथील असल्याचे समोर आले आहे.गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कार अडवून झडती घेतली असता, सीटखाली कप्प्यात ही मोठी रक्कम लपवलेली आढळून आली. चौकशीत संबंधितांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने परिस्थितीच्या गांभीर्यामुळे गाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आली.
त्यानंतर महसूल विभाग, कार्यकारी दंडाधिकारी व बँकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ शुटिंग करत नोटांची मोजणी करण्यात आली. अखेर ही रक्कम आयकर विभागाला माहिती देऊन जिल्हा कोषागारात जमा करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा व उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.