लोणार (हॅलो बुलडाणा/ संदीप मापारी) संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या पालखी मार्गाची गंभीर दुरवस्था लक्षात घेता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सरकारला दोन जूनपर्यंत मार्ग सुस्थितीत न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
१५ मे रोजी पालखी मार्गाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खरात म्हणाले की, २०१७ मध्ये या कामाचा ठेका श्रीहरी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला गेला होता. सुमारे ४ हजार कोटींच्या बजेटमध्ये हे काम अपेक्षित दर्जाने पूर्ण झाले पाहिजे होते. मात्र, कंपनीने काम अर्धवट सोडल्यामुळे दुसऱ्या ठेकेदाराकडे काम सोपवण्यात आले. दुर्दैवाने त्यानेही दर्जाहीन काम केले. आज या ३४ किलोमीटर लांबच्या पालखी मार्गावर अनेक ठिकाणी खोल भेगा पडल्या आहेत. या भेगांमुळे दुचाकीस्वार अपघातग्रस्त होऊन काही जण अपंगही झाले आहेत.
वारकऱ्यांची पंढरपूर वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अशा अपूर्ण व धोकादायक रस्त्यावरून वारकऱ्यांचा प्रवास अत्यंत कठीण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सरकारला विनंती केली की, उर्वरित दुरुस्त्या तातडीने पूर्ण कराव्यात व दोन जूनपर्यंत पालखी मार्ग सुस्थितीत आणावा.
याचबरोबर, कामात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. “वारकऱ्यांच्या नावाने रस्ते उभारून कोट्यवधींचे कमिशन उकळायचे आणि प्रत्यक्षात निकृष्ट काम करायचे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
शेवटी ते म्हणाले की, “वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सोयीसाठी जर रस्ता वेळेत पूर्ण न झाला, तर मी स्वतः जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेन. काही अनुचित घडल्यास याची जबाबदारी एमएसआरडीसीच्या मंत्र्यांवर राहील.”
पालखी मार्गाच्या कामावरून सुरू झालेली ही टीका आता सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत. वारकरी आणि स्थानिक जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, हे सरकारसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.