बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणाऱ्या देऊळघाट गावाचे 2 वेळा सरपंच राहिलेले बिस्मिल्ला खां किश्वर खां यांचे काल 8 मे रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 85 वर्ष होते. त्यांच्या जाण्याने देऊळघाट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले देऊळघाटचे माजी सरपंच बिस्मिल्ला खां हे बुलढाण्याचे माजी आमदार तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. 2 वेळा त्यांनी देऊळघाट येथील सरपंच पद भूषविले आहे, तर सलग 25 वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून वार्डातील जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. गावातील नागरीकांच्या दुखासुखात ते नेहमी पुढे असायचे. मागील काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती.5 दिवसा अगोदर त्यांना बुलढाणा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते,परंतु आज गुरुवारी सकाळी प्राणज्योत मालवली.त्यांना देऊळघाट येथील कब्रस्तान मध्ये सुपूर्द ए खाक करण्यात आले. अंत्यविधीच्या कार्यक्रमात जिल्हाभरातील सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.