बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्रातील नागरीकांना आयुर्वेदीक उपचार पध्दतीचा अधिकाधिक लाभ मिळावा आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीकोनातुन राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालयाची निर्मीती करणे गरजेचे आहे,असे मत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केले आहे.
आयुर्वेद ही प्राचीन उपचार पध्दती असुन या उपचार पध्दतीला वाव देण्याच्या दृष्टीकोनातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना केली. त्यामुळे देशात आणि विदेशातही आयुर्वेदाचा प्रचार प्रसार मोठया प्रमाणात झाला आहे. पाश्चात्य देशातील नागरीकही आता भारतीय आयुर्वेदीक उपचार पध्दतीचा वापर करीत आहेत. देशातील युवक, युवती, महीला आणि वंचीत घटकांना सशक्त बनविण्यासाठी आयुष अंतर्गत आरोग्य सेवा देशात महत्वपुर्ण भुमिका बजावीत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेत आयुर्वेदानेही आपल महत्व पटवुन दिले आहे. त्यामुळे लोकांचा कल आयुर्वेदीक उपचार पध्दतीकडे वाढत चालला आहे.
महाराष्ट्र राज्यातही आयुर्वेदीक वनसंपदा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्याचा फायदा राज्यातील नागरीकांसह आयुर्वेद शिक्षक प्रणालीलाही मोठया प्रमाणात होऊ शकतो. आयुर्वेदाचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त प्रमाणात होऊन या उपचार पध्दतीचा लाभ नागरीकांना मिळावा या दृष्टीकोनातुन राज्यात केंद्रीय आयुष विश्वविदयालयाची स्थापना करण्या संदर्भांत केंद्र सरकार विचार करीत आहे. त्यामुळे राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालयाची अथवा आयुष विभागाची स्थापना करणे गरजेचे आहे. राज्याच्या प्राथमिक सहमतीचा निर्णय केंद्र सरकारकडे पाठवा असेही केंद्रीय आयुषमंत्री यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत सांगितले.