बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पाण्याशिवाय कोणीच जगू शकत नाही. माणसा प्रमाणे झाडांना दररोज पाणी लागते.मात्र रस्त्यावरील झाडांचे संवर्धन व्यवस्थित होत नसल्याने येथील श्याम चितळे या वृक्षप्रेमीने रस्त्यावरील झाडांना प्लास्टिक बॉटल बांधून झाडे जगविण्यासाठी ‘एक बॉटल अमृताची’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
‘पाणी’ हे जीवन आहे. पाण्याशिवाय या पृथ्वीवरील कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. कुठलाही सजीव जीव मग तो मनुष्य, प्राणी किंवा झाड असू दे, सगळ्यांना पाण्याची तितकीच गरज असते. पाणी नसेल तर आपले जीवन शून्य आहे. ज्याप्रमाणे आपण रोज पाणी पितो त्याचप्रमाणे झाडांना देखील दररोज पाणी घालावे लागते. झाडांना दररोज पाणी घातल्याने झाड ताजीतवानी, फ्रेश दिसतात. जर का आपण एक – दोन दिवस जरी झाडांना पाणी घातले नाही तर ही झाड कोमेजून जातात.आता तर सूर्य आग ओकत आहे.भर उन्हाळ्यात सावली देणाऱ्या झाडांना पाणी मिळावे या दृष्टिकोनातून येथील वृक्ष प्रेमी शाम चितळे यांनी टाकाऊ प्लास्टिक बॉटल कट करून येथील जयस्तंभ चौक व इतर ठिकाणच्या रस्त्यावरील झाडांना व्यवस्थित बांधल्या आहेत. या बॉटल मधून थेंब थेंब पाणी झाडांच्या मुळापर्यंत झिरपते.या झाडांना जगविण्यासाठी आणि बुलढाण्यातील हिरवेपणा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जागृत नागरिकांनी या प्लास्टिक बॉटल मध्ये एक पाण्याची भरलेली बॉटल सकाळ- संध्याकाळी टाकावी, असे आवाहन चितळे यांनी केले आहे.