मेहकर (हॅलो बुलडाणा) समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण दरोड्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. बोईसर (जि. पालघर) येथे राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला छत्रपती संभाजीनगरजवळ चिकलठाणा परिसरात चार दरोडेखोरांनी आडवून जबर मारहाण केली आणि तब्बल ११ लाख १२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून पसार झाले. ही घटना शुक्रवारी (२ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली असून, या प्रकारामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. समृद्धी महामार्गावरील सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.डॉ. चैताली आणि डॉ. श्रावण शिंगणे हे आपल्या कुटुंबासोबत मेहकरहून बोईसरकडे परतत असताना नाथनगर पुलाजवळ त्यांच्या कारपुढे एक पांढऱ्या रंगाची स्कोडा कार अचानक आडवी लावण्यात आली. “इंश्युरन्स वाले आहोत” असे सांगत चौघांनी त्यांची कार अडवून किल्ली काढली. त्यानंतर डॉ. शिंगणे दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आली. डॉ. चैताली आणि आई मीना निंभोरे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावण्यात आले.
डॉ. चैताली यांनी मोबाईलने आरोपींचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईलही हिसकावून घेतला. पळून जाताना डॉ. श्रावण यांनी कारने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र दरोडेखोरांनी पुन्हा त्यांना मारहाण करून कारची स्मार्ट किल्ली फोडून परत दिली आणि “पाठलाग केला तर ठार मारू” अशी धमकी देत पसार झाले.दरोडेखोरांचे वर्णन स्पष्ट असून, चौघेही तब्येतीने मजबूत, विविध पोशाखात होते. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक श्रीनिवास धुळे तपास करत आहेत.
या घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अत्याधुनिक महामार्गावर रात्रीच्या सुमारास अशा प्रकारे झालेला दरोडा ही गंभीर सुरक्षा ढिसाळपणाची स्पष्ट साक्ष आहे. प्रशासन आणि पोलिसांना आता या दरोडेखोरांचा तातडीने शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे.