शेगाव (हॅलो बुलडाणा) शेगाव तालुक्यातील भास्तन व कठोरा येथील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात क्रेन द्वारे वाळूची तस्करी होत असून, महसूल यंत्रणेने वाळू तस्कर ‘पुष्पां’ पुढे गुडघे टेकल्याचे चित्र आहे.दरम्यान कलेक्टर साहेबांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
शेगाव तालुक्यातील भास्तन व कठोरा येथील पूर्णा नदी पात्रातून भोटा, कठोरा, सगोडा या घाटाचा लिलाव झाला नसतांना परीसरातील वाळू तस्कर क्रेन द्वारे लाखो ब्रास वाळूचा उपसा करून शासनाला कोट्यावधींचा चूना लावत आहे. अवैध वाळू उपसा व वाहतूक जोमात सुरू असून, महसूल यंत्रणा मात्र कोमात गेल्याचे दिसून येते. वाळू तस्करीला नियंत्रणात आणण्यासाठी महसूल विभागाने बैठे पथक तैनात केले तरी ‘सब कुछ मॅनेज है!’ ची भाषा वाळू तस्करांकडून वापरली जाते. प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी याकडे लक्ष द्यावे व अवैध वाळू उपसा थांबवून तस्कराच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी केली जात आहे.











